बेळगाव महानगरपालिका सभागृह तहकूब होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे. दरम्यानच्या काळात माजी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर अनेक नगरसेवक पद नसूनही आपल्या प्रभागाच्या विकासासाठी झटत आहेत. बेळगावमधील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ यासंदर्भात केलेली खास बातचीत-
बेळगाव महानगरपालिका सभागृह तहकूब होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला. परंतु आपल्या प्रभागातील जनतेच्या कोणत्याही कामासाठी आजपर्यंत मी मागे हटलो नाही. प्रभागातील जनतेच्या समस्यांपासून ते महानगरपालिका कार्यक्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्येसाठी आपण कार्यरत आहे. अतिवृष्टीत झालेल्या घरांच्या पडझडीनंतर अनेक नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून दिली आहे. ज्येष्ठ नागरिक पेन्शन, विधवा पेन्शन अशा पद्धतीच्या सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आजपर्यंत जनतेची कोणतीही कामे अडलेली नाहीत.
महानगरपालिका अधिकाऱ्यांच्यामार्फत प्रभागातील सर्व कामे वेळोवेळी पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच प्रभागातील स्वच्छतेची समस्या, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समस्या वेळोवेळी लक्ष पुरवून सोडविण्यात आल्या आहेत. नगरसेवक पदी असतानाही आपण जनतेची सेवा केली आहे आणि सभागृह तहकूब झाल्यानंतरही जनतेची सेवा सातत्याने केली आहे. यामुळे सभागृह तहकूब झाल्याचा विचार आपल्या मनात कधी आला नाही, अशी प्रतिक्रिया विनायक गुंजटकर यांनी बेळगाव लाइव्हशि बोलताना व्यक्त केली.
![Gunjatkar corp](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/12/IMG-20201204-WA0258.jpg)
जनतेने विश्वासाने आपल्याला नागरसेवकपदी निवडून दिले आहे. त्यामुळे सध्या सभागृह तहकूब झालेले असूनही जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी वरचेवर संपूर्ण प्रभागातील गल्लोगल्ली जाऊन जनतेशी चर्चा करण्यात येते. अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांना समस्या निर्माण झाल्या होत्या.
त्याही आपण पुढाकार घेऊन सोडविल्या आहेत. याशिवाय प्रभागातील पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या यासह मूलभूत सुविधांसाठी सातत्याने आणि वेळोवेळो मनपा अधिकाऱ्यांच्या सहयोगाने आपण पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनतेने कौल दिला तर निवडणूक रिंगणात नक्कीच उतरणार असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.