कोरोनपर्व सुरू होऊन महिन्यांचा कालावधी उलटला असून या कालावधीत संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम घेण्यात संपत आले आहे. फेब्रुवारी 2020 पासून बंद असलेल्या शाळा आता पुन्हा 1 जानेवारीपासून सुरू होणार असून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी स्थानिक शिक्षण संस्थांना महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
यासंदर्भात उच्च प्राथमिकसाठी विद्यागम उपक्रम, दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग 1 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे शिक्षण खात्याने जाहीर केले आहे. कोरोनाचा नवा विषाणू तयार झाल्याबाबत नागरिकांत पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळा सुरू करण्यात आल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास परवानगी देतील का? हा प्रश्न शिक्षण खात्यासमोर उभा आहे.
अद्याप कोरोनाची लस बाजारात उपलब्ध झाली नसून विद्यार्थी आणि पालक यांच्या मनातील भीती दूर सारून याबाबत जागृती करुन तसेच योग्य खबरदारीनुसार शाळा सुरू केल्या जातील, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
1 जानेवारी रोजी सूरु होणाऱ्या शाळांच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्क्रीनिंग व जंतुनाशक फवारणीची जबाबदारी ग्राम पंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महापालिकेला देण्यात आली आहे. जवळपास शैक्षणिक वर्ष संपत आले असून आता उर्वरित कालावधीसाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात येऊ नयेत, अशी पालकांची इच्छा आहे.
सध्याचे शैक्षणिक वर्ष हे ऑनलाइन क्लासच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी पार पाडले असून 2 ते 3 महिन्यांसाठी पुन्हा वर्ग भरविण्यात येऊ नयेत. कोरोनाची लस अद्याप उपलब्ध झाली नसून कोणतीही जोखीम आपल्या मुलांच्या बाबतीत घेण्यास पालकांची मानसिकता तयार नाही. परंतु 1 जानेवारीपासून वर्ग सुरू करण्याआधी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असा विश्वास शिक्षण खात्याने दिला आहे.