चिकोडी रोड आणि रायबाग स्टेशन दरम्यानचा नैऋत्य रेल्वेचा 13.94 कि.मी. अंतराचा दुपदरी रेल्वेमार्ग गेल्या 16 डिसेंबर रोजी कार्यान्वित झाला आहे. हा मार्ग गेल्या 2015 -16 साली मंजूर झालेल्या 1,191 कोटी रुपये खर्चाच्या लोंढा -मिरज या 186 कि.मी. अंतराच्या दुपदरी मार्गाचा एक भाग आहे.
सदर प्रकल्पाचा दुसरा भाग असणारा घटप्रभा ते चिकोडी रोड दरम्यानचा 16 कि.मी. अंतराचा दुपदरी रेल्वे मार्ग मागील वर्षी कार्यान्वित झाला होता. त्याचप्रमाणे रायबाग ते कुडची दरम्यानचा दुपदरी रेल्वे मार्ग 2021 अखेर पूर्ण करण्याचे लक्ष आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कालावधीत बेंगलोर ते मुंबई दरम्यानचा रेल्वे संपर्क अधिक सुधारित आणि बळकट होण्यासाठी मंत्री अंगडी जातीने लक्ष ठेवून असायचे हे विशेष होय.
सदर्न सर्कल बेंगलोरचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. राय यांनी गेल्या नोव्हेंबरच्या आरंभी चिकोडी रोड आणि रायबाग स्टेशन दरम्यान घालण्यात आलेल्या दुपदरी रेल्वेमार्गाचे वैधानिक निरीक्षण करून वेग चांचणी घेतली होती.
उत्तर कर्नाटकातील बेळगांव जिल्ह्यात घालण्यात आलेला हा रेल्वे मार्ग चिकोडी आणि रायबाग स्टेशन दरम्यान एकाच वेळी प्रवासी आणि माल वाहतूकीसाठी वापरला जाणार आहे. या रेल्वे मार्गावर 21 लहान ब्रिज, 4 रोड अंडर ब्रिज आणि एक कॅनाॅल ब्रिज आहे.
रेल्वेमार्गाच्या सुधारणे बरोबरच रायबाग स्टेशनची नवी इमारत उभारण्यात असून ती अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज करण्यात आली आहे. रायबाग आणि चिक्कोडी या दोन्ही रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमसह अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.