राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक २०२० अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया मंगळवार दि. २२ डिसेंबर रोजी पार पडणार असून यासाठी उमेदवार, मतदार, कार्यकर्त्यांसहित पोलीस विभाग आणि संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. तालुकापातळीवर जोरदार मोर्चेबांधणी आणि प्रचार करण्यात आले असून आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा मावळल्या आहेत.
आता प्रतीक्षा आहे ती मंगळवारची. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील 3808 जागांसाठी मतदान होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये, निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मार्गसूचीनुसार प्रत्येक नियम आणि अटींचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत.
निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या हृदयाचे ठोके एव्हाना वाढलेही असतील. मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतप्रक्रिया पार पडणार असून बेळगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील उमेदवारांचे भविष्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे.
निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी प्रत्येक तालुक्यात भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली .तसेच कायदा सुव्यवस्थेसाठी आवश्यक मुद्दे यांचीही पाहणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सामुग्री पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची धावपळ सुरू झाली असून या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक २७ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीचे निकाल ३० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
संपूर्ण राज्यभरात या निवडणुकीसाठी उपलब्ध जागांपैकी तीन ते चारपट उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून युवा पिढीसह तालुकास्तरावरील मातब्बर राजकारणीही आपले नशीब या निवडणुकीत आजमावणार आहेत.L