जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आज पाहणी केली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज अथणी, कागवाडम चिकोडी आणि निपाणी तालुक्यात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती घेतली.
यासंदर्भात निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी प्रशिक्षण आणि इतर विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व प्रकारच्या खबरदारीचा उपाययोजना अंमलात आणण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी नियंत्रण आणि अनुचित प्रकारांवर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, तसेच न्याय आणि पारदर्शक निवडणुकीसाठी प्राधान्य देण्यात यावे, असा सल्ला त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला.
राज्यभरात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यासाठी २२ डिसेम्बर रोजी मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी २७ डिसेम्बर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया आणि नियमांचे पालन करण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण देण्यात येणार असून निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही शंका असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी, तहसीलदार, अधिकारी उपस्थित होते.