ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कॅम्प येथील असदखाँ दर्गा मैदानावर पार्किंगची सोय करण्यात आल्यामुळे आज या मैदानाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूल येथे ग्रामपंचायत निवडणुकीचे मतमोजणी केंद्र उभारण्यात आल्यामुळे नजीक असलेल्या असदखाँ दर्गा मैदानावर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली होती. त्यामुळे मुस्लिम सणासुदीचे दिवस वगळता वर्षभर रिकामा निर्मनुष्य असणाऱ्या असदखाँ दर्गा मैदान आज निवडणुकीचा निकाल जाणून घेण्यासाठी आलेल्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या वाहनांनी भरून गेले होते. त्याचप्रमाणे बेळगांव तालुक्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आले असल्यामुळे दर्ग्याचे मैदान गर्दीने फुलून गेल्याचे पहावयास मिळाले. हातात भगवे ध्वज घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे दर्गा परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच असदखाँ दर्गा मैदानावर आज दिवसभर सर्वत्र वाहनेच वाहने दिसत होती.
निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे असदखाँ दर्गा मैदानाच्या परिसरात आज पुष्पहार आणि गुलाल विक्रेत्यांचा धंदा तेजीत होता. विजयी उमेदवारांचे समर्थक मोठ्या प्रमाणात या विक्रेत्यांकडून गुलाल व पुष्पहार यांची खरेदी करताना दिसत होते. कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे असदखाँ दर्गा येथील कॅम्पातील रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कॅम्प येथील वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला.