काँग्रेसच्या कुरघोड्यांमुळे मागील अधिवेशनात प्राणी हत्या प्रतिबंधक आणि संरक्षक विधेयक संमत करण्यात आले नाही. परंतु गायींसह सर्व प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी भाजप सरकार कटिबद्ध असून आश्वासन दिल्याप्रमाणे या अधिवेशनात गोहत्या प्रतिबंध विधेयक मांडण्यात आले, असे पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान म्हणाले. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ते बोलत होते. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गोहत्या विधेयकाला अनुमोदन देण्यात आले अशी माहितीही त्यांनी दिली.
गाय ही आपल्या भारतीय संस्कृतीतील श्रद्धेचे स्थान आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार आहे. वर्षानुवर्षे गायीची संख्या कमी होत चालली असून ही चिंतेची बाब आहे. अशावेळी पक्षभेद विसरून गायीचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, आणि पशुसंपत्तीची वृद्धी कारवाई, असे आवाहन त्यांनी केले. केवळ राजकीय द्वेष बाळगून सरकारच्या विधेयकांना विरोध करून जनसामान्यांना चुकीचा संदेश पोहोचविणे हे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
भाजप सरकारच्या काळात २०१० साली गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर करताना केंद्र सरकारने घेतलेले आक्षेप लक्षात घेऊन सध्याच्या विधेयकात सुधारणा करण्यात आली आहे. जुन्या विधेयकात म्हशींची कत्तल करण्यासाठी रोख लावण्यात आला होता. परंतु २०२० च्या कर्नाटक प्राणिहत्या प्रतिबंधक आणि संरक्षण विधेयकात १३ वर्षांच्या म्हशींवर निर्बंध घालण्यात आले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात याच मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आला होता. याचसाठी विधेयक अंमलात आणण्यात आले नव्हते.
२०१९ च्या प्राण्यांच्या गणतीनुसार २३८२९६ गायीची प्रतिवर्षी कत्तल करण्यात येत होई. एका दिवसाच्या आकडेवारीनुसार ६६२ गायीची कत्तल करण्यात येत होती. याच वेगाने गायीची कत्तल करण्यात आली तर आगामी काळात गायी केवळ पुस्तकात चित्रस्वरुपात दिसतील. याचसाठी भाजप सरकारने पुढाकार घेऊन गायीचे संरक्षण आणि हत्या रोखण्यासाठी विधेयक अंमलात आणले आहे.
गोरक्षणासाठी उत्तरप्रदेश आणि गुजरातसह विविध राज्यात विविध प्रयोग करण्यात येत आहेत. या प्रयोगानुसार गायीच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. गोधनापासून विविध उद्योग सुरु करून या उत्पनादांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशाच पद्धतीने कर्नाटकातदेखील प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोहत्या विधेयक संमत केल्यासंबंधी पशुसंवर्धन खात्याच्या संचालिका डॉ. सोनाली सरनोबत यांनी पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि भाजप सरकारचे अभिनंदन केले आहे.