गेल्या 24 तासात बेळगांव जिल्ह्यात नव्याने 45 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 25 हजार 802 इतकी झाली आहे. आतापर्यंत 341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यात 288 सक्रिय रुग्ण आहेत.
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज शनिवार दि. 5 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 3,02,521 जणांचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 38,247 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 288 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 29,186 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 2,34,800 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 3,01,430 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 25,802 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज नव्याने आढळलेल्या 45 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 2,70,954 नमुने निगेटिव्ह असून सक्रिय रुग्ण 288 आहेत. त्याचप्रमाणे 3,050 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 341 रुग्णांचा मृत्यू झाला असून 25,173 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज शनिवारी आढळलेल्या 45 रुग्णांमध्ये बेळगांव तालुक्यातील 18, गोकाक तालुक्यातील 13, अथणी तालुक्यातील 4, हुक्केरीतील 3 रायबाग व चिकोडी तालुक्यातील प्रत्येकी 2 तसेच सौंदत्ती, खानापूर व रामदुर्ग तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे.