Wednesday, January 22, 2025

/

तालुक्यातील साऱ्यांची नजर ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे

 belgaum

बेळगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचातींसाठी २२ आणि २७ डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीतील मतमोजणी 30 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणीला सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार आहे. बेळगाव कॅम्प परिसरातील बी. के. मॉडेल हायस्कुल, एन. एस. पै. स्मरणार्थ पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेच्या इमारतीत ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात तहसीलदारांनी माहिती दिली असून यामध्ये सर्व उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवाराच्या वतीने नेमून दिलेल्या एजंटांनी नियोजित स्थळी मतमोजणी प्रक्रियेच्या आधी १ तास हजर रहावे अशी सूचना देण्यात आली आहे. यासोबतच मास्कचा वापर करणे सक्तीचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींना आत प्रवेश देण्यात येणार नाही. मतमोजणी केंद्रात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोविड-१९ चाचणी अनिवार्य असेल. मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक व्यक्तीची कोविड चाचणी वैद्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. कोणत्याही व्यक्तीमध्ये लक्षणे आढळून आल्यास तात्काळ त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणी आणि उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मतमोजणी कार्यासाठी पंचायतीनुसार १२० टेबलची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ८ पासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणी संपल्यानंतर संबंधित एजंटांना बाहेर पाठविण्यात येईल आणि त्यानंतर दुसऱ्या पंचायतीच्या मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. संबंधित एजंटांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणीला प्रारंभ करण्याआधी ध्वनिक्षेपकावरून पंचायतीचे नाव पुकारण्यात येईल. त्यानंतरच संबंधित पंचायतीच्या एजंटना आत प्रवेश देण्यात येईल.

मतमोजणी एजंटनी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या विशिष्ट रंगाचा पास कर्मचाऱ्यांना देणे अनिवार्य असेल. या मतमोजणी प्रक्रियेसाठी येणाऱ्या विविध ग्रामपंचायत उमेदवारांच्या तसेच मतमोजणी एजंटांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था सीपीएड मैदानावर करण्यात आली आहे. तसेच दुचाकी वाहनांची व्यवस्था कॅम्प परिसरातील आसदखान दर्गा मैदानावर करण्यात आली आहे.

निवडणूक अधिकारी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था चंदन टॉकीज परिसरात अथवा शेजारी असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी स्थळाच्या पूर्वेला आंबा भवन परिसर आणि पशचिमेकडील ग्लोब थिएटर परिसर इतर वाहतुकीसाठी बंद असेल. उमेदवार आणि मतमोजणी एजंट किंवा कोणत्याही व्यक्तीला मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन, तंबाखू, बिडी, सिगारेट, अन्नपदार्थ आणि कोणत्याही निर्बंध घातलेल्या वस्तू नेण्यास परवानगी नाही. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उमेदवार आणि एजंटांनी शांततेत ही मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार कुलकर्णी यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.