ग्रामपंचायत निवडणूक निवडणुक मतमोजणीसाठी बी. के. मॉडेल हायस्कूल येथील रस्ता अडविण्यात आल्यामुळे काँग्रेस रोड व कॅम्प परिसरातील रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र आज सकाळी पहावयास मिळाले. त्यामुळे आपल्याला चांगले रहदारी व्यवस्थापन आणि वाहन चालविण्याचे चांगले तारतम्य याची किती गरज आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीमुळे आज सकाळी काँग्रेस रोडवरील तिसऱ्या रेल्वे गेटपासून ते थेट कॅम्प येथील शौर्य चौकापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बी. के. मॉडेल हायस्कूल येथील मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून अडविण्यात आल्यामुळे राणी चन्नम्मा सर्कल आणि बसवेश्वर सर्कल येथून येणारी वाहतूक मिलिटरी महादेव मंदिर मार्गे वळविण्यात आली होती. यात भर म्हणून कॅम्प येथे हे ब्रेकडाऊन झाल्यामुळे एक उसाचा ट्रक नादुरुस्त अवस्थेत रस्ता अडवून उभा होता. या सर्व गोष्टीमुळे संबंधित मार्गावर वाहनांची गर्दी होऊन मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
बसवेश्वर सर्कल येथून येणारी वाहतूक जर पाटील गल्लीमार्गे वळवण्यात आली असती तर आजची ही वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी झाली असती. निवडणुकीसाठी दर्गा मैदानावर पार्किंगची सोय करण्यात आल्यामुळे शहरात जाण्यासाठी पाटील गल्लीचा मार्ग वाहनचालकांसाठी सुकर झाला असता. तथापि तसे घडले नसल्यामुळे मिलिटरी महादेव मंदिरामागील रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होऊन ट्रॅफिक जॅम झाला होता. परिणामी वाहनचालकांना मनस्ताप करून घेत कासवगतीने आपली वाहने हाकावी लागत होती. याच पद्धतीने आज कपिलेश्वर मार्गावर देखील ट्राफिक जॅम झाला होता.