बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कुटुंब कल्याण विभाग, बेळगाव आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण कोष, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू विरोधी कायदा अमलात आणण्यासाठी, तंबाखू विरोधी मोहीम राबविण्यासाठी तसेच तंबाखूचे दुष्परिणाम याबद्दल जनजागृती करण्यासाठी बुधवार दि. ९ रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन करून सीपीआय कुबेर बोलताना म्हणाले कि, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ हे मनुष्याच्या आरोग्यासाठी अपायकारक आहेत. तंबाखूमध्ये विविध प्रकारच्या रासायनिक अंशांचा समावेश असतो. त्यामुळे तंबाखू सेवन करणे हे टाळावे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेला जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सह निर्देशक डॉ. एस. व्ही. मुन्याळ,पोलीस निरीक्षक कुबेर रायमानेहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, सिगारेटमुळे आरोग्याची हानी होते. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे यापासून प्रत्येकाने लांब रहावे, असा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यशाळेत डॉ. सरोजा तिगडी यांनी तोंडाच्या कर्करोगावर पीपीटीच्या साहाय्यातून व्याख्यान दिले. सध्याची युवा पिढी हि तंबाखूच्या आहारी गेली असून याचे दुष्परिणाम काय आहेत? याची जाणीव आजच्या तरुण पिढीला नाही. गर्भवती महिलेने तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास त्याचे कोणते दुष्परिणाम होतात, यावरही त्यांनी माहिती दिली.
जिल्हा तंबाखू नियंत्रण कोशाच्या सल्लागार डॉ. श्वेता पाटील, यांनी तंबाखू विरोधातील कायदा २००३ (COTPA) अंतर्गत सेक्शन ४ अन्व्ये सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास, तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास रुपये २००/- दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे सेक्शन ५ अन्व्ये तंबाखू उत्पन्न आणि पदार्थांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जाहिरात करण्यास बंदी आहे. तंबाखूजन्य पदार्थांचा अल्पवयीन मुलांवरील होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून सेक्शन ६ अन्वये शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास दंडनीय गुन्हा असल्याचे सांगितले. सिगरेट किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पन्नावर सेक्शन 7 अन्वये निषेध करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षा आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रशिक्षण शिबिरात पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.