कर्नाटक राज्य काँग्रेस कार्यकारिणीच्या नेतृत्वात लवकरच बदल होण्याची शक्यता केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली आहे. बंगळूर येथे आयोजित बैठकीच्या पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता वर्तविली असून भविष्यातील पक्षाच्या हितासाठी हा बदल करणे आवश्यक असून पक्ष संघटनेच्या दृष्टीने हा बदल चांगला असल्याचे मत सतीश जारकीहोळी यांनी वर्तविले आहे.
काँग्रेसच्या कार्यकारिणीत योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. पक्षात राहून पक्षाच्या विरोधात कार्य करणे, एकतर्फी निर्णय घेणे अशांना पक्षातून निरोप देण्यात येणार आहे. कोणा एकामुळे संपूर्ण पक्ष अडचणीत येईल, अशांना पक्षात स्थान नाही. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहून पळसक बळकटीसाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुनर्रचनेत स्थान देण्यात येण्यासंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली. अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली. समूहाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांसाठी पक्ष पुढाकार घेणार असून या बैठकीत अनेक नेत्यांनी मुक्तपणे चर्चा केली आणि संवाद साधला अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या कर्नाटकात अनेक निगम, मंडळे,प्राधिकरण तसेच आरक्षणाची चर्चा सुरु आहे, याबाबतीतहि बंगळूर येथे झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून यासह अनेक विषयांवर साधक – बाधक चर्चा करण्यात आल्याची माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली.
डी. के. शिवकुमार शनिवारी बेळगावमध्ये
शनिवार दि. ५ डिसेंबर रोजी केपीसीसी राज्य अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे बेळगावमध्ये येणार असून सांबरा विमानतळावर त्यांचे एका विशेष विमानातून आगमन होणार आहे. त्यानंतर महालिंगपूर सह अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांचा दौरा असणार आहे.