राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने दिलेल्या सल्ल्यावरून आज गुरुवार दि. 24 डिसेंबरपासून लागू करण्यात आलेला “नाईट कर्फ्यू” अर्थात रात्रीची संचारबंदी तात्काळ मागे घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
नव्या स्वरूपातील कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन तसेच ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आज गुरुवार दि. 24 डिसेंबर 2020 ते शुक्रवार दि. 2 जानेवारी 2021 पर्यंत रोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यात संचार बंदीचा आदेश लागू करण्यात आला होता.
तथापि विरोधी पक्षासह राज्यभरातून सरकारच्या या निर्णयाला नागरिकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे युद्धपातळीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्यानंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनेवरून संचार बंदीचा आदेश मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.