आनंदवाडी, शहापूर येथील सांडपाण्याने तुंबलेल्या गटारींची तात्काळ साफसफाई करावी. तसेच वेळच्या वेळी येथील कचऱ्याची उचल केली जावी. येत्या 8 दिवसात ही कार्यवाही झाली नाही तर रास्तारोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आनंदवाडी महिला मंडळाने दिला आहे.
आनंदवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा लीला मुचंडी आणि सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव -पाटील यांच्या नेतृत्वाखाली आनंदवाडीतील महिलांच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून आयुक्तांनी तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आनंदवाडी, शहापूर येथील गटारींची साफसफाई गेल्या जवळपास तीन महिन्यापासून करण्यात आलेले नाही. त्यामुळे गटारी मध्ये सांडपाणी तुंबून कांही ठिकाणी ते रस्त्यावर वाहत आहे यामुळे दुर्गंधीचे वातावरण निर्माण होऊन डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
परिणामी डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. या भागातील कचऱ्याची उचल देखील गेल्या कांही महिन्यांपासून झालेले नाही. या सर्व प्रकारांमुळे येथील नागरिकांचे विशेष करून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील कोणतीच दखल घेतली जात नाही. संबंधित सुपरवायझर आणि अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तेंव्हा याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन आनंदवाडी शहापूर येथील गटारांची तात्काळ साफसफाई केली जावी. तसेच कचऱ्याची उचल करणाऱ्या गाडीची व्यवस्था केली जावी. येत्या आठ दिवसात ही कार्यवाही झाली नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी माधुरी जाधव पाटील व लीला मुचंडी यांच्यासह कल्पना भांदुर्गे, शोभा गवी, लक्ष्मी काकतीकर, शशिकांत रणदिवे, शशिकांत पास्ते, सुनील सरनोबत, संदीप कोकितकर, विनय पाटील आदींसह आनंदवाडी महिला मंडळ आणि आनंदवाडी युवक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.