शेकडो वर्षाच्या इतिहासाची साक्ष देणारी “कमल बस्ती” आजदेखील बेळगांव भुईकोट किल्ल्याच्या आवारात मोठ्या दिमाखात अभिमानाने उभी असून प्राचीन कलेचा वारसा सांगणाऱ्या या दिगंबर जैन मंदिराचा 816 वा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला.
श्री.श्री.श्री. 1008 नेमिनाथ तीर्थंकर दिगंबर जैन मंदिर पूजा कमिटीकडून कमलबस्तीचे व्यवस्थापन पाहिले जाते. या पुरातन मंदिराच्या 816 व्या वर्धापन दिनानिमित्त भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे राजीव दोड्डणावर आणि विनोद दोड्डणावर यांच्या पुढाकाराने पोस्ट खात्याकडून कमलबस्तीचे चित्र असणाऱ्या खास लिफाफ्यासह पोस्टकार्ड आणि स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे बेळगांवात चातुर्मासासाठी आलेल्या प. पू .108 श्री वर्धमान सागर महाराज आणि त्यांच्या शिष्यांतर्फे वर्धापन दिनानिमित्त कमलबस्तीच्या आवारात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या भारतीय पुरातत्व खात्याकडून कमलबस्तीची देखभाल केली जात आहे.
कमल बस्ती हे दिगंबर जैन मंदिर असून रट्ट साम्राज्याचा चौथा राजा कर्तवीर्य याच्या न्यायालयातील बिच्चीराजा या मंत्र्याने या मंदिराची उभारणी केली. रट्ट कालीन अनेक मंदिरे बेळगांव परिसरात आज देखील अस्तित्वात असून त्यांची मुख्य देवता पद्मासनातील भगवान नेमिनाथ आहेत. अनेक शतकांपूर्वी शत्रूंच्या आक्रमणामुळे कमलबस्तीमधील मूळ मूर्ती शहरातील चीक्कबस्तीमध्ये हलविण्यात आली.
कमलबस्तीमध्ये सध्या जी मूर्ती आहे ती अकराव्या शतकातील आहे. या ठिकाणी दगडावर कोरलेले कल्पवृक्षाचे शिल्प दुर्मिळ असून त्याचा तळभाग पौराणिक प्राणी दाखवून सुशोभित करण्यात आला आहे. या पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यात नवग्रह तीर्थंकरांची दुर्मिळ मूर्ती देखील आहे. कमलबस्ती मुख्यमंडप, अंतराल आणि गर्भगृह कशा तीन भागात विभागली गेली आहे. मुख्य मंडपाचे छत्र उलट्या कमळाने सुशोभित करण्यात आलेले आहे. या कमळाला 72 पाकळ्या असून प्रत्येक पाकळीवर तीर्थंकरांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मुखमंडपाच्या आठही कोपऱ्यांना आठ खांब असून त्यावर पालक देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. विश्वाच्या आठ दिशांच्या ज्या पालक देवता आहेत त्यांच्या या मूर्ती आहेत.