बेळगाव स्मार्ट सिटी योजनेतून उद्यमबाग, टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिटी सिलियन्स, ट्राफिक वायोलेशन मॉनिटरिंग व पार्किंग एन्फोर्समेंट योजना राबविण्यात येणार आहे. या तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून या योजना राबविण्यात येणार आहेत.
या कामासाठी स्मार्ट सिटी विभागाने तब्बल ४.५ कोटी रुपयांचा राखीव निधी ठेवला आहे. या कामासाठी निविदा काढण्यात आली असून १० फेब्रुवारी रोजी ही निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
उपनगरांमध्ये आजपर्यंत ही योजना राबविण्यात आली नव्हती. सध्या बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही योजना राबविण्यात आली असून उपनगरांमध्ये पार्किंग आणि वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या अनुषंगाने उपनगरातील उद्यमबाग, टिळकवाडी आणि शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही योजना राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
शहरात या योजनेसाठी ९ ठिकाणी स्मार्ट पोल उभारण्यात आले आहेत. शहर परिसरात अनुचित प्रकार वाढत चालले आहेत. या प्रकारांवर रोख लावण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी ही योजना कार्यान्वित होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतील हे सीसीटीव्ही कॅमेरे थेट विश्वेश्वरय्या येथील कमांड व कंट्रोल सेंटरशी जोडले आहेत.