बेळगाव जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज माघारीचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे मंगळवारी निवडणूक रिंगणात लढतीसाठी उतरलेल्या उमेदवारांची थेट लढत होणार आहे.
सोमवारी दुपारपासून तालुका भागात प्रचारासाठी जोरदार तयाऱ्या सुरु झाल्या असून २२ तारखेला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत धुरळा उडणार आहे.
दरम्यान ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरु झाली असून काही भागातील ग्रामपंचायतींवर बिनविरोध सदस्यांची निवड झाल्यामुळे आजपासूनच गुलालाची उधळण सुरु झाली आहे. दरम्यान सोमवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असून तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी कलादगी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी आज सीमेवरील चेकपोस्टवर तपासणी केली.
राज्यभरातील ग्रामपंचातींसाठी होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून जरी सुरु झाली असली तरी आगामी काळात निवडणूक होणार हे निश्चित असल्यामुळे अनेक उमेदवारांनी आधीपासूनच तयारी सुरु केली होती.
मंगळवारपासून प्रचाराला जोरदार उधाण येणार असल्याचे चित्र दिसून येत असून अनेक ग्रामपंचायतीत निर्णायक स्वरूपातील लढत होणार आहेत. हजारोंच्या संख्येने निवडणूक रिंगणार उतरलेले उमेदवार आपले नशीब आजमावणार असून आगामी पाच वर्षांसाठी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे.