ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर रिंगणात उतरलेल्या इच्छुकांनी प्रचाराची रणधुमाळी उठवली आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी अनेकांनी अर्ज भरून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
सध्या बेळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील चित्र स्पष्ट झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चित्रही आज स्पष्ट होणार आहे. यासंबंधी रात्री उशिरापर्यंत अनेक कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात काम सुरू होते. दरम्यान बेळगाव तालुक्यात आता आमिषे दाखवण्यास सुरुवात झाली आहे.
तर दुसरीकडे आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहे. सध्या प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन मत आपल्याला द्यावी अशी विनवणी करण्यात येत आहे. प्रत्येक वार्डात चार ते पाच उमेदवार उभे असल्याने मतदारांची ही कोंडी झाली आहे. या आधी केलेल्या ग्राम विकासावरच अनेकांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे ही रणधुमाळी मोठ्या प्रमाणात धुरळा उडणार असे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागात सुगीचे हंगाम संपले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या धांदलीत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही बुधवारी पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात सौंदत्ती रामदुर्ग चिकोडी निपाणी अथनी कागवाड रायबाग या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत तर पहिल्या टप्प्यातील चित्र स्पष्ट झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील हे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र या आधीपासूनच अनेकांनी आपल्या प्रचाराला वेग दिला आहे. काहींनी तर गुप्त बैठका घेऊन ओल्या पार्ट्यानाही सुरुवात केली होती. आता त्या बरोबरच मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपल्यालाच मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.