कर्नाटकातील राजकारणाचा कुतूहलाचा विषय ठरलेला मंत्री मंडळ विस्तार भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर होणार आहे, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हायकमांडच्या निर्णयाकडे सर्व राजकीय नेत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आज बेळगावमध्ये पार पडलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
यासंबंधी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन, दोन दिवसात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु १५ दिवसांचा कालावधी उलटला तरीही हायकमांडने कोणताही आदेश दिला नाही, यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह सर्वच नेत्यांच्या नजरा हायकमांडच्या आदेशाकडे खिळल्या आहेत. येत्या दोन दिवसात मंत्री मंडळ विस्ताराबाबत योग्य सूचना दिल्या जातील, अशी माहिती हायकमांडकडून आली असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.
मराठा विकास प्राधिकरण निर्मितीच्या मुद्द्यावरून कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे. यासंदर्भात आज बेळगावमध्ये भाजप कार्यकारिणीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री मंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. अनेक नेत्यांच्या उपस्थितीती पार पडलेल्या या बैठकीत ‘बंद’ व्यतिरिक्त मंत्री मंडळ विस्ताराबाबतही चर्चा करण्यात आली होती. यावेळी भाजप कोर कमिटीची बैठकही पार पडली. या बैठकीला भाजप राज्य प्रभारी अरुण सिंग उपस्थित होते.
यांच्यासह जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळीही उपस्थित होते. मुख्यमंत्री लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूचना जारी करणार आहेत, अशी माहिती जिल्हा पालकमंत्र्यांनी यावेळी दिली होती.
यासोबतच बेळगावमधील कार्यकारिणीची बैठक आटोपल्यानंतर बंगळूर येथे मुख्यमंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप राज्य प्रभारी अरुण सिंग यांनी दिली.