Friday, November 15, 2024

/

बीपीसी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ : “साईराज” आणि “विशृत” ची विजयी सलामी

 belgaum

दीपक नार्वेकर पुरस्कृत आणि बोर्ड ऑफ पेरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. राजू उद्घाटनाच्या दिवशी साईराज वॉरियर्स आणि विशृत स्ट्रायकर्स या संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून विजयी सलामी दिली.

कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर या भव्य साखळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिमखाना मैदानावर आज गुरुवारी सकाळी प्रमुख पाहुणे डॉ. रवी पाटील यांच्या हस्ते यष्टि पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धेचे पुरस्कर्ते दीपक नार्वेकर, गजानन भांदुर्गे, स्वप्निल बधाले, विवेक पाटील, प्रमोद जपे, नासिर सनदी, जयसिंग रजपुत, विक्रम देसाई, चेतन बैलुर आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर उद्घाटनाच्या सामन्यातील प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांची परिचय करून देण्यात आला आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.

उद्घाटनाच्या सामन्यात साईराज वॉरियर्सने प्रतिस्पर्धी दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब संघावर 5 गडी राखून विजय संपादन केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब संघाने 21.2 षटकात सर्व गडी बाद 104 धावा काढल्या. हे आव्हान लीलया पेलताना साईराज वॉरियर्सने अवघ्या 16 षटकात 5 गडी बाद 106 धावा काढून सामना खिशात टाकला. साईराजचा रोहित पाटील (59 धावा) हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याला प्रमुख पाहुणे दीपक नार्वेकर, स्वप्नील बधाले, महेश फगरे व नासीर सनदी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

आजच्या दुसऱ्या सामन्यात विशृत स्ट्रायकर्स संघाने प्रतिस्पर्धी गणेश हुबळी टायगर्स संघाला 29 धावांनी पराभूत केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विशृत स्ट्रायकर्स संघाने मर्यादित 25 षटकात 9 गडी बाद 171 धावा झळकाविल्या.

प्रत्युत्तरादाखल गणेश हुबळी टायगर्स संघाला 21 षटकात 8 गडी बाद 115 धावा काढता आल्या. या सामनातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी विशृत संघाचा रविचंद्र उक्कली (68 धावा) हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे प्रशांत भादवणकर, विक्रम देसाई, जयसिंग रजपुत व चंदन कुंदरनाड यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. सदर क्रिकेट स्पर्धा येत्या 20 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.