सालाबादप्रमाणे बेळगांव तालुक्यासह खानापूर, चिकोडी आणि हुक्केरी तालुक्यांमध्ये मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजनास परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मराठी साहित्य महामंडळ बेळगांवतर्फे आज सोमवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.
मराठी साहित्य महामंडळ बेळगांवचे अध्यक्ष ॲड. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखालील महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज सकाळी सादर करण्यात आलेले उपरोक्त मागणीचे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये बेळगांव तालुक्यातील कडोली उचगांव, बेळगुंदी, निलजी, कुद्रेमनी, सांबरा, खानापूर तालुक्यातील माचीगड, चिक्कोडी येथील शिट्टीहळ्ळी आणि हुक्केरी तालुक्यातील कारदगा येथे स्थानिक लोकांकडून गेल्या अनेक वर्षापासून मराठी साहित्य संमेलने भरविली जातात. ही साहित्य संमेलने म्हणजे पूर्णपणे साहित्यावर आधारित कार्यक्रम आहे.
एक दिवसाच्या या कार्यक्रमात लेखक, कवी, विचारवंतांसह कन्नड व उर्दू भाषिक साहित्यप्रेमी यांचा सहभाग असतो. देशातील सध्याची परिस्थितीची जाणीव ठेवून आम्ही यंदाच्या साहित्य संमेलनांचा कालावधी कमी केला आहे. या वर्षीची मराठी साहित्य संमेलने संपूर्ण दिवसभर न होता 3 तासांची होतील. त्याचप्रमाणे यावर्षी ग्रंथदिंडी मिरवणूक, मंडप आणि साहित्यप्रेमींसाठी दुपारची भोजन व्यवस्था या सर्वांना फाटा देण्यात येणार आहे. संमेलन संबंधित गांवातील योग्य जागी घेतले जाईल आणि पाहुणे मंडळी देखील जवळच्या परिसरातील असतील. त्याप्रमाणे कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. तेंव्हा कृपया ही संमेलने भरण्यास परवानगी दिली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष ॲड सातेरी यांच्यासह कार्याध्यक्ष गुणवंत पाटील, प्रा. आनंद मेणसे, मधु पाटील, सुधीर चव्हाण, एम. बी. गुरव, बी. जी. गौंडाडकर, कृष्णा शहापूरकर आदी उपस्थित होते. निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ॲड. नागेश सातेरी म्हणाली की, मागील वर्षी मराठी साहित्य संमेलनाला परवानगी देण्यात प्रशासनाकडून कांही प्रमाणात अडथळा आणण्यात आला होता. आता तर देशात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे निमित्त पुढे करून मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजनास आडकाठी केली जाऊ नये यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.
त्याचप्रमाणे 10 -15 दिवस अगोदर संमेलनाच्या सर्व संयोजकांना त्यांनी संमेलनाची तारीख निश्चित करून ती महामंडळाला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी देखील साहित्य संमेलनाच्या तारखा घेऊन पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे संबंधित पोलिस स्थानकांना कळविण्याचे आश्वासन दिले आहे असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांची मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीतील आजची भूमिका सकारात्मक होती त्यांनी आमची बाजू व्यवस्थित ऐकून घेतली. त्यामुळे या वेळेची साहित्यसंमेलने परंपरा खंडित न होता मोठ्या प्रमाणात नसली तरी लहान प्रमाणात आम्ही यशस्वी करू असा विश्वास ॲड. सातेरी यांनी व्यक्त केला.
बेळगांव जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर 16 साहित्य संमेलने होतात. असे उदाहरण आज देशातील अन्य कोणत्याही जिल्ह्यात पहावयास मिळत नाही. या साहित्य संमेलनांमुळे त्या -त्या परिसरातील तरुणांना लिखाणाची प्रेरणा मिळाली असून त्यांच्यापैकी आज कांही लेखक, कांही कवी तर कांही संयोजक बनले आहेत, अशी माहिती प्रा. आनंद मेणसे यांनी यावेळी दिली.