Thursday, January 9, 2025

/

आमदारांच्या फोटोला काळे- घरचा आहेर आहे का?

 belgaum

बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके आणि त्यांच्या समर्थकांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चव्हाटा चषक २०२१ या क्रिकेट स्पर्धेचा मोठा फलक बेळगाव शहरातील आरटीओ सर्कल नजीक लावण्यात आला आहे.

या बॅनरवरील आमदार अनिल बेनके यांच्या छायाचित्रावर काळ्या रंगाची शाई फेकण्यात आली आहे. कन्नडाभिमानी कस्तुरी नामक महिलेने हे कृत्य केले असून या महिलेने याआधीही मनपावरील ध्वज उतरविण्यासाठी प्रयत्न केला होता. भाजपच्या सत्तेत बेळगावमधील मराठी द्वेष पुन्हा उफाळून येत असून बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेला अशा घटनेमुळे धक्का पोहोचत नाही का? असा सवाल संतप्त मराठी जनता व्यक्त करीत आहे.

मागील महिन्यात सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर आमदार अनिल बेनके यांनी कर्नाटक सरकारची बाजू उचलून धरत मराठीविरोधी आणि सीमाप्रश्नाबाबतीत गरळ ओकली होती. दरम्यान आमदार अनिल बेनके यांच्यावर संतप्त मराठी भाषिकांनी जोरदार टीकाही केली होती. परंतु महिन्याचा कालावधी उलटताच कन्नड संघटनांनीच आमदार अनिल बेनके यांना घरचा आहेर दिला, अशाही संतप्त प्रतिक्रिया सीमाभागातील समस्त तरुणवर्ग आणि मराठी भाषिक जनता व्यक्त करत आहे.Mla benke board

बेळगाव शहरात हाफपीच क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करण्यात आली आहे. याच्या जाहिरातीकरणासाठी आरटीओ सर्कलजवळ मराठी भाषेत बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर भाजप आमदार अनिल बेनके यांचे छायाचित्र आहे. सदर बॅनरवर कन्नडमध्ये उल्लेख नसल्याने कन्नड संघटना या बॅनरवरून राजकारण करत असून बेळगावच्या शांततेला धोका पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला स्वतःला मराठी म्हणवून कर्नाटक सरकारची बाजू उचलून धरणाऱ्या आमदार बेनकेंनी सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर चुकीचे वक्तव्य करून समस्त मराठी भाषिक जनतेच्या भावनेशी खेळ केला होता. याचीच पोचपावती कन्नड संघटनांनीच त्यांना दिली आहे, अशीहि बोचरी टीका मराठी भाषिकातून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकशाही मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून नेहमीच मराठी भाषिक जनता आपले न्याय्य हक्क मागत आहे. कोणत्याही मागणीसाठी कायद्याच्या चौकटीत राहूनही अनेक मराठी भाषिक तरुणांवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे नाव पुढे करून अनेकवेळा दडपशाहीचे प्रकार झाले आहेत.

परंतु सीमाभागात बहुसंख्य मराठी भाषा आणि मराठी भाषिकांच्या जनतेच्या भावनेशी आणि त्यांच्या हक्कांची पायमल्ली करू पाहणाऱ्या तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजवत शांतता भंग करू पाहणाऱ्या अशा कन्नड दुराभिमानी व्यक्तींना प्रशासन योग्य शासन करेल का? असा सवाल आता मराठी भाषिक जनता विचारात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.