मराठा विकास प्राधिकरण निर्मितीच्या विरोधासाठी कन्नड संघटनांनी ५ डिसेंबर रोजी पुकारलेल्या कर्नाटक बंद संदर्भात आज भाजप कार्यकारिणीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी भाजपचे विविध नेते उपस्थित होते. या परिषदेत बोलताना राज्य भाजप उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराना म्हणाले, ४ डिसेंबर रोजी प्रदेश भाजप प्रभारी अरुण सिंग हे येणार आहेत.
४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता कोर कमिटीची बैठक बेळगावमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सायंकाळी ५ वाजता कार्यकारिणीची बैठक गांधी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे, शिवाय ५ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदचे कोणीही समर्थन केले नाही, अशी माहिती सुराना यांनी दिली.
या परिषदेला मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, सी. टी. रवी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग दर्शविला होता. जवळपास १४० जणांची कार्यकारिणी या परिषदेला उपस्थित होती. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर काहीजणांनी व्हर्च्युअल आपला सहभाग दर्शविला.
यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपच्या जागा निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली. बेळगाव, मस्कीसह बसवकल्याण येथे होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आखण्यात येणाऱ्या रणनीती संदर्भातही चर्चा करण्यात आली.
या बैठकीला जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी हेही उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले कि, एच. विश्वनाथ यांना मंत्रिपद देणे अयोग्य असल्याचा आदेश हायकोर्टाच्या विभागीय खंडपीठाने दिला आहे. यासंदर्भात तातडीने हायकोर्टाकडे अपील करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बंगळूर आणि दिल्ली येथील वकीलांशी चर्चाही करण्यात आली आहे. १७ आमदार हे अपात्र असल्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. यासंदर्भातही आपण सुप्रीम कोर्टाकडे अपील केले आहे, असे जारकीहोळी म्हणाले.