सीमाभागातील मराठी जनता अनेक प्रशासकीय योजनांपासून वंचित आहे. सीमाप्रश्नामुळे सीमाभागातील मराठी युवक अनेक गोष्टींपासून वंचित असून या युवकांना महाराष्ट्रातील सेवेत संधी मिळावी यासाठी बेळगावच्या सुरज नंदकुमार कणबरकर या युवकाने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पात्र लिहिले आहे.
नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्यात ७००० पदांसाठी पोलीस भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पोलीस भरतीत बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावातील मराठी युवकांना स्थान मिळावे.
अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. सीमाभागातील असंख्य तरुण शिक्षित असूनही बेरोजगार आहेत. सीमाभागातील युवकांना कर्नाटक प्रशासकीय यंत्रणेत स्थान मिळत नाही. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून सीमाभागातील जनतेला महाराष्ट्राचाच भाग समजून महाराष्ट्राच्या सेवेसाठी संधी द्यावी, अशी मागणी सुरज कणबरकर या युवकाने केली आहे.
महाराष्ट्र राज्य विधी मंडळात या मुद्द्यावर याआधीही चर्चा झाली होती. परंतु दुर्दैवाने यावर ठोस उपाय निघाला नाही. कर्नाटक राज्यात मराठी युवक कितीही उच्च शिक्षित असले तरीही त्यांना उच्च पदावर नोकरी मिळणे कठीण आहे. कन्नड सत्ता आणि सीमाप्रश्नामुळे येथील मराठी तरुण वर्ग खितपत पडला आहे. शिवाय सीमाभागात मराठी जनतेचा विचार करणारे एकही खंबीर नेतृत्व नाही.
महाराष्ट्रात सध्या आघाडीचे सरकार असून सीमाप्रश्नाची चाड या सरकारला आहे. शिवाय सीमाभागाशी बांधिलकीही आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सीमाभागातील मराठी तरुणांना महाराष्ट्रातील पोलीस भारतीसह इतर सेवेच्या पदासाठीही महाराष्ट्र सरकारने संधी द्यावी, अशी मागणी सीमाभागातील अनेक मराठी युवा तरूणांकडून केली जात आहे.