सीमाभाग – बेळगाव येथे कार्यरत असणारी शिवसेना पदाच्या विळख्यात अडकली असून सध्या सीमाभागात दोन गटात शिवसेनेचे विभाजन झाले आहे. दोन्ही गटांच्या वतीने जिल्हा प्रमुख पदासाठी हेवेदावे सुरु असून सीमाभागात कार्यरत असणारी शिवसेना कार्यकारिणी बरखास्त होण्याची चिन्हे दिसत आहे.
सीमाभागातील शिवसेनेतील काही युवा कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन १७ नोव्हेंबर रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट दिली. त्यादरम्यान शिवसेना नेत्यांच्या भेटीदेखील या युवकांनी घेतल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसून येत्या काळात सीमाभागातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्या सीमाभागातील शिवसेनेच्या कार्यकारिणीत दोन जिल्हाधिकारी असल्याचे दावे करण्यात येत आहेत. शिवसेना कार्यकारिणीत बदल करण्याची मागणी सीमाभागातील शिवसैनिकांच्यावतीने करण्यात येत आहे. या कार्यकारिणीत अनेक वरिष्ठ नेत्यांनी पदे उपभोगली असून आता युवा पिढीकडे अधिकार सोपविण्याची मागणी युवा शिवसैनिकांच्यावतीने होत आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार तरुणांना ही संधी मिळावी, अशी चर्चाही जोर धरू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या पदाधिकाऱ्यांचा वाद संपुष्टात येऊन कार्यकारिणी पुनर्रचना करून नव्या पिढीकडे अधिकार सोपवावेत, अशीही मागणी करण्यात येत आहे.
बेळगावात होणारी पोट निवडणूक देखील लढवण्याची चाचपणी शिवसेना नेतृत्वाकडून केली जात असून त्या अगोदर सेनेची पुनर्रचना होण्याची मागणी वाढू लागली आहे.
सीमाभागात सुरु असलेल्या शिवसेनेतील वादामुळे उघडपणे कोणीही आपली मते मांडण्यास तयार नसून शिवसेनेसाठी पुढील काळात ही धोकादायक बाब आहे. याबाबत दादर येथीळ कार्यालयात शिवसेना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर अनेक तक्रारी गेल्या असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली असून सीमाभागात शिवसेना पक्षसंघटन वाढत नाही, याची दखलही वरिष्ठानी घेतली असल्याचे समजते. सीमाभागात शिवसेना ही केवळ नावापुरती असून केवळ पदासाठी हेवेदावे करण्यासाठी शिवसेना कार्यरत आहे का? असा सवाल शिवसैनिक विचारात आहेत. अनेक पक्ष हे पक्ष संघटन आणि विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत. परंतु सीमाभागातील शिवसेना ही आपापसात वाद, भांडणे आणि पदासाठी रस्सीखेच करण्यापुरती मर्यादित असल्याचे आरोपही शिवसैनिकांच्या वतीने करण्यात येत आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर सीमाभागातील ही परिस्थिती पोहोचल्यामुळे आता आगामी काळात बेळगाव जिल्हा प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार? सीमाभागातील शिवसेना ही पुन्हा प्रवाहात येईल का? शिवसेना मोठ्या प्रमाणात आपले जाळे विणले का? याची उत्कंठा शिवसैनिकांना लागली आहे.