बेळगाव ग्रामीण पोलिसांनी कारगाडीतून बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना अटक करून त्यांच्याकडील 129 लिटर गोवा बनावटीच्या दारूसह एकूण दहा लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संतोष महादेव कवंदळकर (वय 33, रा. यडोगा -हल्याळ, जि. कारवार) आणि कारचालक महंमद गौस निसार अहमद मणियार (वय 24, रा. हल्याळ जि. कारवार) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बेळगांव तालुक्यातील कर्ले गावानजीकच्या बहाद्दरवाडी क्रॉस येथे गेल्या 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता बेळगांव ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून उपरोक्त कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमध्ये एका होंडासिटी सिविक कारमधून बेकायदा वाहतूक करण्यात येत असलेली 129 लिटर गोवा बनावटीची दारू कारगाडीसह जप्त करण्यात आली.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 18,000 रुपये किंमतीच्या दारूच्या 180 मि.लि. गोल्डन एस ब्ल्यू दारूच्या 720 बाटल्यांचे 15 बॉक्स आणि 10 लाखाच्या कार गाडीचा समावेश आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.