मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेण्याचे आवाहन कर्नाटक राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केले आहे. बेळगावमधील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी वचनबद्ध आहे. केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या कृषी विधेयकातील त्रुटी सुधारण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला पुकारलेला बंद मागे घ्यावा त्याचप्रमाणे ९ डिसेंबर रोजी होणारे आंदोलनदेखील मागे घ्यावे, असा आग्रह त्यांनी केला.
केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या कृषी विधेयकाबाबत प्रगतशील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. विधेयकातील त्रुटी आणि त्यातील जमेच्या बाजू लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत, अशी माहिती कडाडी यांनी दिली.
केंद्र सरकारच्या विरोधात आणि आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी अनेक राजकीय पक्ष चुकीच्या पद्धतीने विरोध करत आहेत, आणि शेतकऱ्यांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांसमवेत चर्चा करण्यास तयार असून कोणत्याही राजकीय पक्षाच्या गोष्टींना भुलून शेतकऱ्यांनी बंद पाळू नये, शिवाय हा बंद मागे घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.
सरकार शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने विविध योजना आखत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. विरोधकांचा हा डाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले हित लक्षात घेऊन कोणतेही पाऊल उचलावे, असा सल्ला इराण्णा कडाडी यांनी शेतकऱ्यांना दिला.
या बैठकीला मुरगेंद्रगौडा पाटील, भाजप नेते, शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.