कोविड अनलॉक प्रक्रियेनंतर अनेक लोक हे रेल्वेचा प्रवास अवलंबत आहेत. अद्याप प्रवासी रेल्वे संपूर्णपणे सुरु झाल्याणसुं पुणे मार्गाने धावणाऱ्या काही रेल्वे सेवा आहेत. परंतु व्यावसायिक दृष्टिकोनातून बेळगाव-मिरज-हुबळीसाठी कोणतीही रेल्वे नाही. या मार्गावरून रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिटीझन कौन्सिलच्यावतीने हुबळी रेल्वे विभागाच्या अजयकुमार सिंग यांना निवेदन देण्यात आले आहे.
बेळगावचा विकास युद्धपातळीवर सुरु आहे. विमानतळाच्या धर्तीवर बेळगाव रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात येत आहे. यासोबतच बेळगावमधून जास्तीत जास्त ठिकाणी रेल्वे सुरु करण्याचाही प्रयत्न होत आहे. ट्रॅकसुद्धा जोडण्यात येत आहेत. सध्या ट्रकजोडणीचे काम पूर्णत्वास आले असून या पार्श्वभूमीवर बेळगाव-मिरज-हुबळी या मार्गावरून रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. बेळगावमधील जनतेसाठी या मार्गावरून रेल्वे सेवा सुरु होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम विभागांतर्गत या मार्गावरून त्वरित सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्यातील उत्तर पश्चिमेला बेळगाव शहर असून या शहराच्या सीमेला महाराष्ट्र आणि गोवा राज्यांची सीमा आहे. यामुळे बहुतांशी जनता हि बेळगावमध्ये दाखल होते. कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये विकासाच्या दृष्टीने अनेक सचिवालये विकसित केली आहेत. त्यासोबतच कर्नाटक राज्यातील बेळगाव हे दुसर्या क्रमांकाचे निर्यात करणारे शहर आहे. त्याचप्रमाणे बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात लघु उद्योगही आहेत. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठही बेळगावमध्ये आहे. या विद्यापीठाशी सहा अभियांत्रिकी महाविद्यालये, दोन वैद्यकीय महाविद्यालये संलग्न आहेत.
या विद्यापीठात बेळगाव व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय गोकाक, रायबाग, चिकोडी, घटप्रभा, अळणावर, लोंढा, खानापूर भागातून अनेक प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून दररोज प्रवास करत असतात. आणि बहुतांशी प्रवासी हे रेल्वेवरच अवलंबून असतात. सध्या या सर्व नागरिकांची गैरसोय होत असून लवकरात लवकर ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सिटीझन कौन्सिलचे सचिन तेंडुलकर, सेवंतीलाल शहा, विकास कलघटगी, अरुण कुलकर्णी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.