स्टार एअर कंपनीकडून ट्विटरद्वारे नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार बेळगांव शहर आणखी एका स्थळाशी हवाईमार्गे जोडले जाणार असून हे स्थळ बहुदा ओझर (नाशिक) हे असण्याची शक्यता आहे.
ओळखा आमचे हवाई संपर्काचे पुढील स्थळ? हे स्थळ एक शहर असून या शहराला “वाईन कॅपिटल ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे प्राचीन शिवमंदिरासाठी देखील हे शहर प्रसिद्ध आहे, अशा आशयाचे ट्वीट स्टार एअरकडून करण्यात आले आहे. या ट्वीटमधील वर्णन लक्षात घेता, बेळगांवला हवाई मार्गाने जोडले जाणारे स्टार एअरचे नवे स्थळ हे निश्चितपणे नाशिक असणार आहे.
बेळगांव जेंव्हा नाशिकला जोडले जाईल तेंव्हा ते 11 शहरांशी हवाईमार्गे जोडले जाणार आहे. सध्या बेळगांव येथून हैदराबाद, बेंगळूर, इंदोर, पुणे, म्हैसूर, तिरुपती, कडप्पा, सुरत, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना विमानसेवा सुरू आहे. बेळगांव विमानतळाचा प्रगतीचा आलेख अलीकडे उंचावला आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात या विमानतळावरून 652 विमान फेऱ्या झाल्या असून 29,568 प्रवाशांनी ये -जा केली आहे. उडाण योजनेअंतर्गत बेळगांवसाठी ज्या हवाई मार्गांचे वाटप करण्यात आले आहे, त्यापैकी जोधपूर, जयपूर व नागपूर यांची घोषणा झालेली नाही.
बेळगांवसाठी उडान -3 योजनेअंतर्गत असलेले मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. बेळगाव ते हैदराबाद – इंटर ग्लोब (इंडिगो), स्पाइस जेट,/ टर्बो मेगा (ट्रू जेट). बेळगाव ते तिरुपती – घोडावत (स्टार एयर), टर्बो मेगा (ट्रू जेट). बेळगाव ते मुंबई – स्पाईस जेट, घोडावत (स्टार एअर). बेळगांव ते पुणे – अलाईन्स एअर. बेळगाव ते सुरत – घोडावत (स्टार एअर). बेळगाव ते कडप्पा – टर्बो मेगा (ट्रू जेट). बेळगांव ते म्हैसूर – टर्बो मेगा (ट्रू जेट). बेळगाव ते इंदोर – घोडावत (स्टार एअर). बेळगांव ते जोधपूर – घोडावत (स्टार एअर) अद्याप सुरू नाही. बेळगांव ते जयपूर घोडावत (स्टार एअर) अद्याप सुरू नाही. बेळगांव ते अहमदाबाद घोडावत (स्टार एअर). बेळगाव ते ओझर नाशिक – घोडावत (स्टार एअर) घोषित. बेळगांव ते नागपूर – घोडावत (स्टार एअर) अद्याप सुरु नाही.