राज्यभरात दोन टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून शुक्रवार दि. ११ डिसेंबर पर्यंत तब्बल ५ हजार १७८ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी दिवसभर इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी लगबग तर सुरु होतीच त्यासोबतच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. राज्यभरातील एकूण जागांपेक्षा तब्बल तीनपट अर्ज दाखल झाले आहेत. बेळगाव तालुक्यातील ५५ ग्रमपंचायतींसाठी हि निवडणूक होणार असून अर्ज छानणी आणि अर्जाची माघार यानंतर एकंदर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बेळगाव तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजेच येळ्ळूर, या ग्रामपंचायतीसाठी ३० जागांसाठी तब्बल ९० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर इटगी मध्ये २८, नंदगडमध्ये २३ जागांसाठी शंभरहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. तर कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीत ३४ जागांसाठी १३७ अर्ज दाखल झाले आहेत. यासोबतच उचगाव ग्रामपंचायतीच्या २१ जागांसाठी ८३ तर ककती मध्ये १९७ अर्ज दाखल झाले आहेत.
पहिल्या टप्य्यात ५ हजार १७८ तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १३४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामद्ये सौन्दत्ती तालुक्यात पहिल्याच दिवशी 43 अर्ज दाखल झाले आहेत, त्यापाठोपाठ चिकोडी तालुक्यात २७, निपाणीमध्ये २२, रायबागमध्ये १६, रामदुर्गमध्ये १५, अथणीमध्ये ६ तर काग्वाडमध्ये ५ असे एकूण १३४ अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज भरण्यासाठी असलेल्या मुदतीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायतींच्या समोर गर्दी केली होती. दुसर्या बाजूला अधिकारी वर्गाने अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवले होते. दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत ग्रामपंचायतींवर विजयी झेंडा रोवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार कंबर कसली आहे.