संपूर्ण राज्याला मोठ्या प्रमाणात कोरोनावरील लसीची गरज असल्यामुळे कर्नाटक राज्य सरकारने लसीचा साठा करण्यासाठी बेंगलोर आणि बेळगांव येथे कूलर आणि फ्रिझरने सुसज्ज दोन मोठी कोठारं स्थापन केली आहेत.
बेंगलोर आणि बेळगांव येथील कोरोना लसीच्या कोठारांव्यतिरिक्त प्रादेशिक पातळीवर लस साठा करण्यासाठी आणि वितरणासाठी चित्रदुर्ग, म्हैसूर, मंगळूर कलबुर्गी आणि बागलकोट येथे पांच प्रादेशिक लस साठा केंद्रीय स्थापण्यात आली आहेत. बेळगांवात जानेवारी अखेर कोरोनावरील लस दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीचा साठा करणे आणि त्यानंतर तिचे वितरण करणे या यासंदर्भातील तयारी जोमाने सुरू केली आहे.
कोरोना लसीचे बॉक्स मुख्यत्वेकरून हैदराबाद, चेन्नई आणि पुणे येथून बेळगांवात दाखल होणार आहेत. त्यानंतर बेळगांव येथून ही लस बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, कारवार, विजयपुरा आणि कोप्पळ याठिकाणी धाडली जाईल. कोरोना लसीची वाहतूक कशी करावी, त्यासाठी किती तापमान ठेवावे आदींसाठी मार्गदर्शक सूची तयार करण्यात आली आहे.
जिल्हा आणि तालुका पातळीवर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व समुदाय केंद्राच्या ठिकाणी असलेल्या औषधालयांमध्ये 180 डिपफ्रिजर आणि आईस लाईन्ड रेफ्रिजरेटर्स बसविण्यात आले आहेत.
आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या 28,195 लोकांना कोरोनावरील लस टोचण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 2 लाख पोलीस कर्मचारी, आशा, अंगणवाडी आणि नागरी कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये 50 लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस टोचली जाईल.