बेळगांव जिल्ह्यातील एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री जम्मू-काश्मीरच्या शोपियाना जिल्ह्यातील जवूरा गावामध्ये घडली.
चंद्रा उर्फ चेतन पाटील (रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगांव) असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नांव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.
जवूरा गावानजीकच्या सुरक्षा दलाच्या तळावर गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर तळावरील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जवान चंद्रा पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.
याप्रकरणी संबंधित पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर चंद्र पाटील या जवानाचा मृतदेह सेनेकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून नेर्ली गावात सदर जवानाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.