आगामी बेळगांव लोकसभा पोट निवडणुकीसाठी कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले जाणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे नेते व ग्रामविकास मंत्री एच. ईश्वरप्पा यांनी केले आहे. त्यावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ईश्वरप्पा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हे अविश्वसनीय, दुर्दैवी आणि निंदनीय आहे. परंतु यात आश्चर्याची कोणतीही गोष्ट नाही. केवळ एकाच समुदायाकडे राजकीय शक्तीचे अधिकार आहेत असे हिंदुत्वाला वाटते, ही विचारधारा आपल्या संविधानात सोबत अस्तित्वात राहू शकत नाही.
आपल्या संविधानात स्वातंत्र्य, बंधुत्व, समानता व न्याय याबाबत सांगण्यात आले आहे, असे ओवेसी यांनी म्हंटले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले आहे.
आम्ही हिंदू समुदायातील कुरबूर, लिंगायत, वक्कलिग, ब्राह्मण आदी कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट देऊ शकतो. मात्र एक गोष्ट नक्की आहे की मुस्लिमांना आम्ही तिकीट देणार नाही, असे सांगून ईश्वरप्पा यांनी भाजप वगळता कोणत्याही पक्षात लोकशाही नाही असे म्हंटले होते.
70 वर्षीय एच. ईश्वरप्पा हे राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते असून ते कुरबुर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. लोकांचा विश्वास जिंकून विजय मिळवू शकणाऱ्या उमेदवाराची राज्यातील व राष्ट्रीय पातळीवरील नेते निवड करतील. बेळगांव हे हिंदूंचे केंद्र आहे. त्यामुळे इथून मुस्लीम उमेदवार देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे ईश्वरप्पा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले होते.