ईस्टरनंतर ख्रिसमस हा ख्रिश्चन बांधवांसाठी महत्त्वाचा सण असून समस्त बेळगाववासियांनी ख्रिसमसमध्ये सहभागी होऊन ख्रिश्चन बांधवांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन बेळगांव डायोसिसचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी केले आहे.
बेथलहॅम येथे मध्यरात्री येशू ख्रिस्तांचा जन्म झाला असल्यामुळे 24 डिसेंबर रोजी मध्यरात्री ख्रिसमस साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन 24 डिसेंबर रोजी ख्रिश्चन बांधवांनी रात्री 9:30 वाजेपर्यंत ख्रिसमस साजरा करावा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम होतील. मात्र कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचीनुसार यावेळी चर्चमधील कार्यक्रमांना मर्यादित लोकांना उपस्थित राहता येईल. धर्मगुरू ज्या ठिकाणी असतील तेथून ते गुरुवारी मध्यरात्री निर्दिष्ट प्रार्थना म्हणतील. ख्रिश्चन बांधवांनी देखील त्यांचे अनुकरण करावयाचे आहे, असे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.
येशू ख्रिस्ताच्या जन्माची माहिती देताना ते म्हणाले की बेथलहॅम येथे यशुंचा मध्यरात्री गाईच्या गोठ्यात जन्म झाला. जगाला शांती, प्रेम आणि न्याय यांचा पवित्र संदेश देणारे येशु वयाच्या 30 वर्षापर्यंत सुतार काम करायचे. त्यानंतर पुढच्या तीन वर्षात परमेश्वराने आपल्यावर जगात शांती प्रेम आणि न्याय याचा संदेश पोहोचविण्याची जबाबदारी टाकली आहे आहे याची जाणीव येशुंना झाली.
ईश्वराचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी घराबाहेर पडलेल्या येशूंची शिकवण अनेकांनी आचरणात आणली अनेकांनी विरोध केला. याविरोधातूनच त्यांना क्रूसावर चढविण्यात आले. तथापि त्यांनी दिलेला शांती, प्रेम आणि न्यायाचा संदेश आज देखील दररोज फक्त चर्चमध्येच नाहीतर जगभरामध्ये सर्वत्र शिकविला जातो. येशू हे हे आजच्या मानवाच्या प्रगतीचा कणा आहेत.
ख्रिसमस हा सण समाजातील जे लोक त्रासात आहेत त्यांचा विचार करावयास लावणारा आहे. यासाठी आपण सर्वांनी समाजातील बेसहारा, दीनदुबळ्या, गरीबगरजू लोकांना मदत केली पाहिजे असे सांगून बिशप डेरेक फर्नांडिस यांनी समस्त बेळगाववासियांना ख्रिसमसमध्ये सहभागी होऊन ख्रिश्चन बांधवांचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन केले.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1289671414723782/