मराठा विकास प्राधिकरण मुद्द्यावरून कन्नड संघटनांनी सुरु केलेला हैदोस ‘कर्नाटक बंद’वर येऊन ठेपला. ५ डिसेंबर रोजी विविध कन्नड संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या कर्नाटक बंदचा बेळगावमध्ये मात्र फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणत्याही कारणासाठी अनेक संघटना केवळ बंद पुकारत असून अशा प्रकारच्या बंदना आता नागरिक कंटाळून गेले आहेत. आपले म्हणणे सिद्ध करणे जमले नाही तर जनतेला वेठीस धरून बंदची पुकारणी करण्यात येते. परंतु आता नागरिक कोणत्याच बंदना प्रतिसाद देताना दिसून येत नाहीत.
कर्नाटकातील सतत वायफळ बडबड करणाऱ्या तथाकथित कन्नड नेता वाटाळ नागराज याने या बंदीसाठी पुढाकार घेऊन गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या कर्नाटक बंद ला बेळगावमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा ‘रिस्पॉन्स’ नागरिकांनी दिला नाही.
बेळगावमधील रस्त्यांवर बससेवा सुरु आहे, रिक्षा सेवा सुरु आहे, नागरिकांची वर्दळ सुरु आहे आणि अपवाद वगळता सर्व व्यवहारही सुरळीत सुरु आहेत. भाजपच्या कोअर कमिटी सभेसाठी अनेक नेतेमंडळी आज बेळगावमध्ये दाखल झाली आहे. आता कन्नड संघटना केवळ निषेध करण्यापुरती मर्यादित राहिली आहे, असे चित्र बेळगावमध्ये दिसून येत आहे.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायणगौडा गटाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. करवे सोबतच अनेक कन्नड संघटनांनी चन्नम्मा सर्कल जवळ निषेध मोर्चा, आंदोलन केले. परंतु मोठ्या प्रमाणात कर्नाटक बंद ची हाक देऊन जनता आणि सरकारला वेठीस धरू पाहणाऱ्या कन्नड संघटनांचा मनसुभा खुद्द जनतेनेच उधळून लावला असून या बंदचा फज्जा उडाला आहे.
कर्नाटकात ‘बंद’ संमिश्र
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कन्नड संघटनांनी पुकारलेला बंद मागे घेण्याचे आवाहन करूनही कन्नड संघटना मागे हटल्या नाहीत. घोषित केलेला कर्नाटक बंद हा मागे न घेण्याचे कन्नड संघटनांनी स्पष्ट केले. मराठा विकास महामंडळ स्थापनेच्या घोषणेनंतर कन्नड समर्थक संघटनांनी दिलेल्या बंदच्या हाकेला आज संपूर्ण राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
राजधानी बंगळूर येथील माडीवाले, मल्लेश्वरम, के. आर. मार्केट, कलासीपाल्य या भागात भाजीपाला, फळ विक्री, फुले विक्री, आणि दैनंदिन तसेच घरगुती वस्तूंची विक्री दररोजप्रमाणेच सुरु असल्याचे चित्र दिसून येत होते. त्याचप्रमाणे नागरिक, वाहने आणि बाजारपेठ नेहमीप्रमाणेच वर्दळीने भरलेली होती.
कन्नड संघटनांनी पुकारलेल्या बंदला राज्यभरात अपेक्षित प्रतिसाद जनतेने दिला नसून सर्व बाजारपेठ, व्यवहार सुरळीतपणे सुरु असल्याचे निदर्शनास आले. राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी कन्नड संघटना आणि नेत्यांनी निषेध नोंदविण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. काही ठिकाणी व्यवहार बंद करण्यासाठी जबरदस्तीही करण्यात आली मात्र या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे कन्नड संघटनांचा फज्जा उडाला.
कर्नाटक राज्य परिवहनने खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रो स्टेशन, केएसआरटीसी बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर अतिरिक्त सुरक्षा तैनात केली असून १७ विभागामधील दैनंदिन कामकाज कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत सुरु आहे, अशी माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी कन्नड संघटना आणि नेत्यांनी प्रशासकीय इमारतींसमोर निषेध व्यक्त करण्यासाठी विविध आंदोलने केली असून धरणे, निषेध मोर्चा वगळता संपूर्ण कर्नाटकातील व्यवहार सुरळीतपणे सुरु असल्याचे चित्र शनिवारी दुपारच्या वेळेपर्यंत दिसून आले.