सरकारने बाजार उपकर 0.35 टक्क्यावरून 1 टक्क्यापर्यंत वाढविल्याच्या निषेधार्थ बेळगांव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (केसीसीआय), बेळगांव एपीएमसी असोसिएशन व व्यापाऱ्यांनी यांनी आज सोमवारी पुकारलेले “एपीएमसी बंद” आंदोलन 100 टक्के यशस्वी झाले. बेळगांव एपीएमसी मार्केट यार्डातील सर्व व्यापाऱ्यांनी आज आपले व्यवहार बंद ठेवल्यामुळे मार्केट यार्डमध्ये सोमवारी शुकशुकाट पसरलेला होता.
वाढीव उपकराच्या निषेधार्थ आज पुकारण्यात येणाऱ्या बंदसंदर्भात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. शेतकऱ्यांनी आपला माल समितीमध्ये आणू नये, तसेच मालाची पट्टी घेण्यासाठीही येऊ नये, असे आवाहनाद्वारे सूचित करण्यात आले होते. या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद देत आज एकही शेतकरी बेळगांव एपीएमसी मार्केट यार्डकडे फिरकला नाही. बेळगांव मार्केट यार्डात दररोज कोट्यावधीची उलाढाल होत असते सध्या बटाटा रताळी आणि कांदा यांची चांगली आवक सुरू असून दर देखील तेजीत आहे मार्केट यार्डातील व्यवहारामुळे सरकारला कराच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो असे असताना बाजार कर वाढ करून सरकार व्यापाऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत असल्याचा आरोप मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांनी केला आहे.
यापूर्वी देखील बाजार उपकर हा 0.35 वरून 1 टक्का करण्यात आला होता. मात्र यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स आणि संबंधित अन्य संघटनांनी आंदोलन करून उपकर पुन्हा 0.35 इतका करून घेण्यात यश मिळविले होते. आता पुन्हा कर वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात रताळी, बटाटा, गूळ मार्केट असोसिएशनकडून आज एपीएमसी सचिवांना निवेदन देण्यात आले. या बंदमध्ये कांदा मार्केट मधील व्यापारीही सहभागी झाले होते.
काल रविवारी झालेल्या रताळी, गूळ मार्केट असोसिएशनची बैठक बैठकीत आजच्या बंदचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे बेळगांव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने (केसीसीआय) ने सरकारच्या उपकर वाढीच्या निर्णयाविरोधात आज एपीएमसी बंद पुकारला आणि त्याला बेळगांव एपीएमसी असोसिएशन व व्यापाऱ्यांनीदेखील पाठिंबा दर्शविला. परिणामी बेळगांव एपीएमसी मार्केटमधील खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार आज पूर्णपणे बंद असल्यामुळे यार्डात सर्वत्र सामसूम वातावरण दिसून येत होते.