गेल्या नोव्हेंबर 2020 मधील हवाई रहदारीच्या माहिती आधारे बेळगांव विमानतळ हे कर्नाटकातील बेंगलोर आणि मंगळूरनंतरचे सर्वाधिक व्यस्त विमानतळ ठरले आहे. सलग चौथ्या महिन्यात बेळगांव विमानतळाने आपले तिसरे स्थान अबाधित राखले आहे हे विशेष होय.
विमानांच्या बाबतीत बेळगांव विमानतळ 652 विमान फेऱ्यांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर प्रवासी संख्येच्या बाबतीत बेळगांव 26 हजार 568 प्रवाशांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कोणतीही एअरबस अथवा बोइंग विमानसेवा नसताना बेळगांव विमानतळ राज्यातील तिसर्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ ठरणे ही पुढील उत्कर्षासाठी अत्यंत आशादायक बाब आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात बेंगलोर विमानतळ सर्वाधिक प्रवासी संख्येसह व्यस्त विमानतळांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असून त्यामागोमाग मंगळूर, बेळगांव, हुबळी आणि इतर विमानतळांचा क्रमांक लागतो.
कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊननंतर सर्व विमानतळे खुली करण्यात आली असली तरी या अल्पावधीत बेळगांव विमानतळाची प्रगती अत्यंत वाखाणण्याजोगी असल्याचे बोलले जात आहे. तसेच आता जवळपास सर्व विमान कंपन्यांनी कोरोना प्रादुर्भावानंतरच्या आपल्या विमान सेवेला प्रारंभ केला आहे.