सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत धनदांडग्या उमेदवारांची रेलचेल असताना समाज सेवेची आस असणाऱ्या एका सामान्य रिक्षावाल्याने या निवडणूक रिंगणात उडी घेतल्यामुळे ग्रामीण भागात हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीच्या अलतगा प्रभाग क्रमांक 13 त्या निवडणुकीत एक रिक्षावाला आपले भवितव्य आजमावण्यासाठी उतरला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी एक वेगळा विचार घेऊन आपण या निवडणुकीत उतरलो असल्याचे त्याने एका जाहिरात पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
बंडू बाळू सुतार असे या रिक्षावाल्याचे नांव असून तो मूळचा कंग्राळी खुर्द येथील रहिवासी आहे. बंडूचे वय 43 वर्षे असून रिक्षा व्यवसायामध्ये समाधान लाभत नसल्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येऊन समाजसेवा करण्याची इच्छा असल्याचे त्याने पत्रकात नमूद केले आहे.
रिक्षाचालक असल्यामुळे साहजिकच बंडू सुतार याने आपले निवडणूक चिन्ह “रिक्षा” ठेवले आहे. विशेष म्हणजे आपल्या रिक्षाद्वारे तो स्वतःचा प्रचार स्वतःच करत असून पाठीशी कार्यकर्त्यांचे पाठबळ नसताना देखील सामाजिक कार्याची आस बाळगून मोठ्या हिमतीने निवडणूक लढवत आहे.
एकीकडे धनदांडगे उमेदवार पैशाच्या जोरावर बहुसंख्य पाठीराख्यांच्या मदतीने आपला निवडणूक प्रचार करत असताना दुसरीकडे “एकला चलो रे” या पद्धतीने निवडणूक रिंगणात उडी घेतलेल्या बंडू रिक्षावाल्याबद्दल ग्रामीण भागात सध्या चर्चा रंगली आहे.