उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी बेळगावमध्ये सुवर्णविधानसौधची निर्मिती करण्यात आली आहे, यावर नागरिकांनी विश्वास ठेवला. उत्तर कर्नाटकाचा विकास होईल, यावर जनतेला आत्मविश्वास होता. परंतु सुवर्णविधानसौधच्या नेमका उद्देश काय आहे? कोणत्या उद्देशाला अनुसरून हि सुवर्णनिधानसौध सरकारने बांधली आहे? असे प्रश्न उत्तर कर्नाटक विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनी उपस्थित केले आहे.
बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सुवर्णविधानसौधबाबत सरकारला जाब विचारला असून या सुवर्णविधानसौधच्या निर्मितीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेळगावमध्ये निर्माण करण्यात आलेल्या सुवर्णविधानसौधमध्ये आजपर्यंत अधिवेशन घेण्यात आलेले नाही. सुवर्णविधानसौधवर प्रेक्षणीय स्थळाप्रमाणे केवळ विद्युत रोषणाई करणे म्हणजे विकास नव्हे.
उत्तर कर्नाटकातील प्रशासनासाठी हे शक्तिकेंद्र असेल, असे स्वप्न होते. परंतु आता याबाबत स्वप्नभंग झाला असून आता उत्तर कर्नाटकातील जनतेला विकासाची चिंता लागली आहे, येत्या दिवसात उत्तर कर्नाटकाच्या विकासाबाबत सरकारने पुढाकार घेतला नाही, तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा अशोक पुजारी यांनी दिला. आगामी पंधरवड्यात उत्तर कर्नाटकातील सर्व संघटनांना एकत्रित करण्यात येणार आहे. प्रत्येकाचा अभिप्राय घेऊन उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये राज्यस्तरीय कार्यालयांचे स्थलांतर केले पाहिजे, या मागणीसाठी मठाधीशांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी या मागणीचा विचार करून लवकरात लवकर राज्यस्तरीय कार्यालये सुवर्णसौधमध्ये स्थलांतरित करण्याचे आश्वासन देऊन, हे धरणे आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनच दिले त्याची पूर्तता केली नाही, असा आरोप अशोक पुजारी यांनी केला.
यावेळी अशोक पुजारी यांनी गोकाकमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अन्याय, गुंडगिरीच्या घटनेत वाढ होतं चालल्याचे सांगितले. अंकलगीमध्ये झालेल्या घटनेविषयीही त्यांनी खेद व्यक्त केला आणि अशा घटनांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईची पाऊले उचलावीत, असा सल्ला त्यांनी दिला. रमेश जारकीहोळी यांनी जिल्हा पालकमंत्री या नात्याने अशा अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोपींच्या कुटुंबियांना बोलावून चर्चा करून पोलिसांच्या कार्यात हस्तक्षेप केला आहे. त्यापुढेही जाऊन गोकाकमधील डॉ. होसमनी यांच्या रुग्णालयात गोंधळ माजविणाऱ्या आरोपींना क्लीन चिट दिली, हे योग्य नाही. रमेश जारकीहोळी हे माझे स्नेही आहेत. गोकाकमध्ये झालेल्या घटनेसंदर्भात त्यांच्याशी मी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.