“पर्यावरण वगैरे सर्व झूठ आहे. वृक्षतोडीला कशाला विरोध करता? उलट त्याचा आनंद लुटा”, असे अप्रत्यक्ष आवाहन तर प्रशासनाकडून केले जात नाही ना? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. कारण बहिरे आणि मुर्दाड झालेल्या प्रशासनासह वनखाते आणि स्मार्ट सिटी लिमिटेडने निसर्गप्रेमी नागरिकांचा विरोध डावलून वृक्षांची कत्तल सुरूच ठेवली आहे.
शहरातील पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांची कत्तल सुरूच असून आज गुरुवारी अनगोळ मुख्य रस्त्यावरील श्री हरी मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्यावरील दोन मोठे वृक्ष जमीनदोस्त करण्यात आले. चिदंबरनगर येथे गेल्या मंगळवारी एका वृक्षाची विल्हेवाट लावण्यात आल्यानंतर आज हा प्रकार घडल्यामुळे स्थानिक नागरिक आणि वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
श्री हरी मंदिरच्या मागील बाजूस असलेल्या एस. व्ही. रोडवरील गर्द सावली देणारे दोन मोठे वृक्ष आज तोडण्यात आले. या वृक्षांच्या मोठ्या फांद्या तोडून त्यांना बोडके केले जात असताना आसपासच्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होताना दिसत होती.
शहरात सुरू असलेल्या या वृक्षतोडीच्या विरोधात सातत्याने आवाज उठवून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असताना देखील संबंधित खात्यांकडून त्याची थोडीदेखील दखल घेतली जात नसल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे “पर्यावरण वगैरे सर्व झूठ आहे. वृक्षतोडीला कशाला विरोध करता? उलट त्याचा आनंद लुटा”, असेच जणू प्रशासनाकडून सुचवले जात नाही ना? अशी शंका निसर्गप्रेमींनासह नागरिकांना येऊ लागली आहे.