कर्नाटक विधानसभेच्या बेंगलोर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये खानापूरच्या (जि. बेळगांव) आमदार डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांनी कर्नाटकातील मराठा आरक्षण बदलण्यास संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.
कर्नाटकातील मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या वर्गीकरणात चुकीने 3ब (3बी) प्रवर्गामध्ये घालण्यात आले असून त्यात त्वरित सुधारणा करून मराठा समाजाला 2अ (2ए) प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, अशी सूचना करून समस्त मराठा समाजाच्या या प्रलंबित मागणीकडे आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. “माझे (भाजप) सरकार सत्तेवर आल्यानंतर 24 तासात मराठा समाजाचे आरक्षण 3ब बदलून 2अ करेन” असे आश्वासन बी. एस. येडियुराप्पा यांनी दिले होते. याची आठवण देखील आमदार निंबाळकर यांनी यावेळी करून दिली. तसेच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपला दिलेला शब्द पाळण्याची वेळ आता आली आहे, असेही आमदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
मा. मुख्यमंत्र्यांनी आमदार निंबाळकर यांच्या लक्षवेधी सूचनेला दिलेल्या उत्तरात सध्या मराठा समाज 3ब प्रवर्गात असून कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ए. शंकरप्पा यांनी दिलेल्या प्रथम अहवालामध्ये मराठा समाजाला 3ब प्रवर्गातून 2अ प्रवर्गात समाविष्ट करण्याची शिफारस केली असल्याचे नमूद केले.
सदर प्रस्ताव सरकार समोर विचाराधीन असल्याचेही मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दरम्यान मराठा समाजाचा केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला जात असून केवळ घोषणांच्या माध्यमातून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार राजकीय पक्ष करत आहेत, असा आरोप आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी अलीकडे धारवाड येथे झालेल्या मराठा मेळाव्यात केला होता.