सरकारतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट मोबाईलचे वितरण करण्यात आले आहे. यापुढे या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून द्यावी लागणार असल्यामुळे त्यांच्या हातात आता वही एवजी स्मार्टफोन दिसणार आहेत.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकारतर्फे बेळगांव जिल्ह्यात 5,300 स्मार्ट मोबाइल वितरीत करण्यात आले असून विभागीय अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना नवीन ॲपबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ॲपच्या माध्यमातून धान्य वाटपाचा तपशील तसेच इतर प्रकारची माहिती रोजच्या रोज द्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सॅमसंग कंपनीचे मोबाईल देण्यात आले असून मोबाईल योग्यप्रकारे हाताळण्याची सूचना करण्यात आली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कामाचा भार जास्त आहे. तसेच त्यांना विविध प्रकारची माहिती संकलित करावी लागते. आता मोबाईल देण्यात आल्यामुळे त्यांचा कामाचा भार कांही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.
दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल वितरणाचे काम पूर्ण होत आले आहे. कर्मचारी ॲपच्या माध्यमातून माहिती देणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारची माहिती वेळेत मिळणे शक्य होणार आहे अशी माहिती देऊन सर्व कर्मचाऱ्यांनी मोबाईल ॲप्सचा वापर योग्य प्रकारे करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी यांनी केले आहे.