बेळगाव शहरातील अभियंता अमित शिंदे यांना 2020 सालातील सर्वोत्तम निवासी बांधकाम प्रकल्पासाठीचा प्रतिष्ठेच्या इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट आणि अल्ट्राटेक सिमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
काँक्रीट दिनानिमित्त गेल्या 27 डिसेंबर रोजी व्हर्च्युअल अर्थात आभासी बक्षीस समारंभात सदर पुरस्कार शिंदे यांना बहाल करण्यात आला. निवासी इमारत बांधकाम विभागात उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील डॉ. गिरिष सोनवलकर यांच्या निवासस्थानाचे सर्वोत्तम बांधकाम केल्याबद्दल अभियंता अमित शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
याबद्दल शिंदे यांनी सोनवलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह हुबळी येथील आर्किटेक्ट आनंद पांडुरंगी अँड असोसिएट्सला धन्यवाद दिले आहेत.
डॉ. सोनवलकर कुटुंबियांचे सहकार्य आणि प्रोत्साहनामुळेच आपण इतका मोठा निवासी प्रकल्प पुरा करू शकलो. माझ्या कारकिर्दीतील हा एक मैलाचा दगड असून या प्रकल्पाद्वारे आमची क्षमता सिद्ध झाली आहे, असे मत अभियंता अमित शिंदे यांनी व्यक्त केले आहे. उपरोक्त पुरस्कार मिळाल्याबद्दल अमित शिंदे यांचे बांधकाम क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.