ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी सध्या मोहात पडणारे एसएमएस संदेश मोबाईलवर येत असून नागरिकांनी या फसवणुकीपासून सावध राहावे. कोणत्याही संदेशाला प्रत्युत्तर देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तुमचे आधार कार्ड मिळवून देतो, तुम्हाला वैयक्तिक कर्ज हवे असल्यास पाच मिनिटात मिळवून देतो, तुम्हाला अमुक कोटीचे बक्षीस मिळाले असून प्रथम दोन लाख रुपये भरा अशाप्रकारचे एसएमएस संदेश सध्या प्रत्येकाच्या मोबाईल फोनवर येऊ लागले आहेत.
एखाद्याने जर संबंधित लिंक ओपन केली तर त्यामध्ये तुमच्या सर्व माहितीची विचारणा केलेली असते. या प्रकारच्या एसएमएस संदेशांना कांही लोक बळी पडतात आणि आपला पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक आदी सर्व माहिती भरतात. याचा फायदा घेऊन त्यांच्या खात्यावरील पैसे परस्पर लंपास केले जातात.
या पद्धतीने ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. तेंव्हा नागरिकांनी सावध राहावे. आर्थिक व्यवहाराशी संबंधित आपली कोणतीही गोपनीय माहिती त्रयस्थ व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.