रविवारी बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मतदार याद्यांमधील सुधारणेसाठी विशेष उपक्रम हाती घेऊन मतदार याद्यांबाबत आढावा घेतला आहे. स्वतः जातीने या कार्यात लक्ष घालून शहरातील विश्वेश्वरय्या नगर, आझम नगर आणि राम नगरसह विविध भागातील सरकारी शाळेतील मतदार केंद्रांमध्ये भेटी दिल्या.
संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडला असून या निवडणुकीदरम्यान जनतेला आणि उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
मतदार याद्यांबद्दल अनेक ठिकाणी जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून मतदार याद्यांच्या विशेष परीक्षणासाठी आज खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी भेट मोहीम हाती घेतली.
मतदार याद्यांच्या विशेष परीक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन याठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी समर्पक रित्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासमवेत पालिका आयुक्त जगदीश के. एच. आणि इतर मान्यवर उपस्थित होते.