कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीचे निवडणूक अधिकारी (आर.ओ.) उमेदवारांशी असहकार्याने वागत असून विनाकारण त्रास देत आहेत. तेंव्हा त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
उचगाव जि प सदस्य सरस्वती पाटील यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज भरले आहेत. परंतु कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी (आर.ओ.) उमेदवारांशी सहकार्य करत नसून उमेदवारांना सीरियल नंबर देण्यास टाळाटाळ करत आहेत.
त्याचप्रमाणे उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणूक चिन्हे तात्काळ देण्यात आलेली नाहीत. निवडणुकीचा कालावधी कमी असल्यामुळे हे काम खरे तर त्वरेने झाले पाहिजे होते. याखेरीज निवडणुकीच्या चिन्हांचे वाटप सर्व उमेदवारांसमक्ष न करता निवडणूक अधिकाऱ्यांनी एकेकाला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून दरवाजा लावून चिन्हांचे वाटप केले.
प्रभाग क्रमांक 8 मधील एका उमेदवाराचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी सीरियल नंबर चुकीचा असल्याचे कारण पुढे करून नाकारला आहे. परंतु प्रत्यक्षात तहसीलदारांनी दिलेल्या प्रमाणपत्र प्रमाणे तो नंबर होता. यासंदर्भात खुद्द तहसीलदारांनी संबंधित उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सांगून देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी तो स्वीकारला नाही. या पद्धतीने क्षुल्लक चुकांसाठी अर्ज नाकारण्यात आले आहेत.
तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत निवडणूक अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी.बेळगाव तालुक्यात अद्याप मराठी मतदार याद्या पोचल्या नाहीत सर्वत्र मराठी मतदार यादी उपलब्ध नाही ती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी जि प सदस्य सरस्वती पाटील यांच्यासमवेत आर. आय. पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, बी. डी. मोहनगेकर आदी उपस्थित होते.