आज बेळगाव, म्हैसूर आणि हासन जिल्ह्यातील विविध १३ ठिकाणी एसीबी पथकाने मोहीम हाती घेऊन भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली असणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर धाड टाकून कारवाई केली आहे. शुक्रवार दि. १८ डिसेंबर रोजी म्हैसूर, हासन आणि बेळगाव जिल्ह्यातील ३ सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या माहितीवरून एसीबी पथकाने कारवाई केली असून यासंदर्भात संबंधितांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या धाडीत बेळगावमधील आंतरराज्य पाणीपुरवठा विभाग, उपविभाग – १ चे सहायक अभियंता मनोज सुरेश कवळेकर यांच्या विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर धाड टाकण्यात आली. यामध्ये बेळगाव शहरातील अयोध्यानगर येथील निवासस्थान, खानापूर तालुक्यातील संगरगाळी गावातील फार्म हाऊस, कवळेकर यांची बहीण रहात असलेले बेळगाव शहरातील अयोध्यानगर येथील घर, तसेच महाद्वार रोड येथील घर, तसेच कवळेकर यांचे कामकाज सुरु असलेले ठिकाण, सहायक अभियंता कचेरी या सर्व ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यासह म्हैसूर येथील सहायक अरण्य संरक्षणाधिकारी शिवशंकरस्वामी, आणि हासन येथील ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निगमच्या सहायक अभियंत्या अश्विनी व्ही. एन. यांच्या बेहिशेबी मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत त्यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तेची चौकशी आणि तपासणी करण्यात आली असून या कारवाईदरम्यान सापडलेली बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य भ्रष्टाचार विरोधी पथकाने पोलिसांच्या पथकांसहित वरील आरोपींच्या विरोधात कारवाई केली असून यासंबधी पुढील तपास करण्यात येत आहे.