येत्या 18 जानेवारी 2021 रोजी नवीन मतदार याद्या प्रसिद्ध होणार असून त्यानंतर त्याबाबतच्या तक्रारी तसेच नवीन नांवे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांना जनजागृती करण्याची सूचना केली असल्याची माहिती जिल्ह्याचे प्रभारी सचिव ए. के. अतीक यांनी दिली.
बेळगांव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. प्रभारी सचिव अतीक अधिक माहिती देताना म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदार याद्यांची दुरुस्ती तसेच नवीन नांवे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मतदार याद्यांचे काम पूर्ण झाले असून येत्या 18 जानेवारी 2021 रोजी त्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर पुन्हा त्याबाबतच्या तक्रारी तसेच नवीन नांवे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मतदार गणती मतदान केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाचे नांव या मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 38 लाख 26 हजार 715 मतदार असून त्यापैकी 19 लाख 35 हजार 368 पुरुष आणि 18 लाख 91 हजार 347 महिला मतदार आहेत.
यावेळी महिलांची नांवे नोंदविण्याची संख्या कांहीशी कमी झाली आहे. मात्र तरीदेखील त्यांचीही नांवे अधिक प्रमाणात दाखल करण्यासाठी सूचना केल्याची माहिती अतिक यांनी यावेळी दिली. संपूर्ण देशामध्ये मतदार याद्यांचे काम सुरू आहे. मतदार यादीमध्ये नांवे नोंदविण्याचा गुरुवार दि. 17 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे.
त्यानंतर या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. नांवे दुरुस्ती, पत्ता बदलणे यासह इतर तक्रारी ऐकून घेऊन तसेच अर्ज स्वीकारून त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल असे सांगून येत्या 18 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुंडगुंटी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.