एक देश एक साहाय्यवाणी ! अंतर्गत आज बेळगावमधील जनतेसाठी ११२ क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात पोलीस खात्याने आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नवी सेवा जनतेसाठी उपलब्ध केली असून आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारची मदत जनतेला हवी असल्यास ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करून या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
या सेवेचा शुभारंभ आज पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी केला असून संपूर्ण राज्यात ११२ हेल्पलाईन उपलब्ध असणाऱ्या सहा जिल्ह्यानंतर बेळगाव हा सातवा जिल्हा आहे.संबंधित पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतून निरोप गेल्यावर अवघ्या काही सेकंदात जनतेला मदत उपलब्ध होणार असून मदतीसाठी करण्यात आलेल्या फोन क्रमांकाच्या आधारे जीपीएस लोकेशन ट्रॅक करून संबंधित ठिकाणी पोहोचणे हे या सेवेचे वैशिष्ट्य आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितिसाठी याआधी रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांक, अग्निशामक दलासाठी १०२ क्रमांक आणि पोलीस सेवेसाठी १०० क्रमांक असे विविध क्रमांक डायल केल्यानंतर संबंधित सेवा उपलब्ध होत असे. परंतु ११२ क्रमांकाची हेल्पलाईन हि वरील सर्व सेवांसाठी उपयुक्त ठरणार आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस या सर्व सेवांसहित इतर आपत्कालीन सेवा ११२ या क्रमांकावर ERSS अंतर्गत २४ x ७ जनतेसाठी उपलब्ध होणार आहेत.
या सेवेअंतर्गत तक्रारदाराचे जीपीएस लोकेशन, घटनास्थळ हे तात्काळ संबंधित विभागाकडे उपलब्ध होणार आहे, हे ११२ क्रमांकाच्या हेल्पलाइनचे वैशिष्ट्य आहे.
या हेल्पलाईनचे नियंत्रण कक्ष थेट बंगळूर येथून चालविले जाणार असून बंगळूरहून संबंधित पोलीस स्थाकाच्या व्याप्तीत सूचना देण्यात येणार आहेत. १०८, १०२, १०० अशा हेल्पलाईन हळूहळू कमी करण्यात येऊन सर्व हेल्पलाईन एकाच क्रमांकावर जोडण्याची प्रक्रिया कार्यान्वित होणार आहे. या सेवेचा सदुपयोग जनतेने करून घ्यावा, असे आवाहन पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.