“महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पहिले. ते स्वप्न आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया” असे संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केलेले वक्तव्य कर्नाटकातील नेत्यांसह कन्नड संघटनांना चांगलेच झोंबले असून त्यांच्या या वक्तव्याचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी निषेध करून सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम असल्याचे तुनतुने वाजविले आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार आदरांजली वाहताना त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाबद्दल बोलले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्या विविध स्मृतींना उजाळा देत शिवसेना प्रमुखांनी मराठी भाषिकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अजित पवारांनी आढावा घेतला.
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या मनात नेहमीच स्थान मिळविले असून, मराठी भाषिकांची शान आणि अस्मिता वाढावी, यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले. जनतेचे प्रश्न, हक्कासाठी लढा उभारून न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगांव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पहिले. ते स्वप्न आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया” असे अजित पवार म्हणाले होते.
अजित पवारांच्या या वक्तव्याने कन्नड संघटना आणि कर्नाटकातील नेत्यांना याबद्दल पोटशूळ उठला असून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यास सुरुवात झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांचा निषेध नोंदविला आहे. पवार यांचे बोलणे उद्धटपणाचे असून सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम असल्याचे तुणतुणे यावेळी येडियुरप्पांनी वाजविले.
यानंतर सोशल मीडियावर मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासह समाचार घेण्यास मराठी भाषिकांनी सुरुवात केली असून अजित पवारांनी योग्य भूमिका मांडली असल्याच्या प्रतिक्रिया सोशल साईटवर उमटत आहेत. तसेच सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असून सीमावासीयांना नक्कीच न्याय मिळेल, आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल, असा आशावाद मांडण्यात येत आहे.